२३ जुलै नंतर लॉकडाऊन वाढविणार नाही – जिल्हाधिकारी

0
268

पुणे, दि. २१ (पीसीबी) : दहा दिवसाच्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सोमवार पासून सुरू झाला. या टप्प्यात काहीशी शिथिलता आणण्यात आली. 23 जुलैनंतर लॉकडाऊन वाढवणार नाही. मात्र, गर्दी टाळण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. आठवड्याच्या वीकेंडला शनिवारी-रविवारी, लग्न आणि मार्केटला गर्दी होते. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंध घालण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

23 जुलैनंतर काही प्रमाणात निर्बंध असतील. मात्र, नागरिकांना त्रास होणार नसल्याची दक्षता घेतली जाणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासन नियोजन करत असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं. जुलै महिन्यात रुग्ण वाढल्याने कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र, नागरिकांना लॉकडाऊन मान्य नसेल, तर जनतेच्या इच्छेविरुद्ध काहीही करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

सोशल  मीडियाच्या माध्यमातून ते पत्रकारांशी संवाद साधत होते. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त के. वेंकटेशम आणि पालिका अतिरिक्त आयुक्त शंतनु कुमार गोयल यांनी संवाद साधला.

पुण्यात रुग्ण बरे होण्याचा दर 64 टक्क्यांवर

यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात सध्या 17 हजार 54 अॅक्टिव रुग्ण असून रुग्ण बरे होण्याचा दर 64 टक्के आहे. तर मृत्यूदर 2.6 टक्के असून एक टक्‍क्‍यापेक्षा मृत्यूदर कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितलं. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मृत्यू दर 1.6 टक्के आहे. टेस्टिंग वाढल्याने आणि त्वरित निदान झाल्याने मृत्यू दरात घट झाली. मात्र, सरासरी रोज 25 मृत्यू होत असून हे चिंताजनक आहे. मृत्यूदर कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

जिल्ह्यात सध्या सामाजिक प्रसार सुरु आहे, की नाही याबाबत सांगू शकत नाही. आमचं प्रशासनाचं काम आहे. मात्र, सामाजिक प्रसार आहे, असं समजूनच आमचे प्रयत्न सुरु असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.