गुड न्यूज – ऑक्सफर्ड च्या कोरोना व्हायरस लसीचा रिपोर्ट अखेर ‘द लॅन्सेट’ जर्नलमध्ये प्रसिद्ध

0
461

नवी दिल्ली,दि. २० (पीसीबी) – ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोरोना व्हायरस विरोधात विकसित केलेल्या लसीचा रिपोर्ट अखेर ‘द लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. वैद्यकीय क्षेत्राचे या रिपोर्टकडे लक्ष लागले होते. प्रसिद्ध झालेला अहवाल खूपच सकारात्मक आणि उत्साहवर्धक आहे.

प्राथमिक मानवी परीक्षणाचे रिपोर्ट या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. ऑक्सफर्डने बनवलेल्या लसीमुळे जगभरात लाखो नागरीकांचे बळी घेणाऱ्या करोना व्हायरसला रोखता येणे शक्य असल्याचे दिसत आहे. ऑक्सफर्डची लस पूर्णपणे मानवी शरीरासाठी पूर्णपणे सुरक्षित असून ती रोगप्रतिकारक शक्तीलाही चालना देत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

यूके, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत ऑक्सफर्डची ही लस चाचणीच्या निर्णयाक टप्प्यावर आहे. ऑक्सफर्ड, यूके सरकार आणि अस्त्रा झेनेकामध्ये आधीच करार झाला आहे. फेज ३ च्या चाचणीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला तर अस्त्रा झेनेकाकडून या लसीचे मोठया प्रमाणावर उत्पादन सुरु होईल. ऑक्सफर्डच्या या लस प्रकल्पात पुण्याची सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही संस्था सहभागी आहे. सिरमकडून या लसीचे उत्पादन केले जाणार आहे. त्यामुळे यशस्वी ठरलेल्या अन्य लसींच्या तुलनेत ही लस भारतीयांना लवकर मिळू शकते.

चीनमध्ये या लसीची फेज २ चाचणी घेण्यात आली. त्यामध्येही ही लस यशस्वी ठरली. स्वयंसेवकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याचे दिसून आले. चीनमध्ये एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या चाचणीत ५०० पेक्षा जास्त स्वयंसेवक सहभागी होते. “AZD1222 या लसीमुळे SARS-CoV-2 विरोधात शरीरात रॅपिड अँटीबॉडी आणि टी-सेलची निर्मिती झाल्याने आम्ही उत्साहीत आहोत” असे अस्त्रा झेनेकाचे मीनी पँगालोस यांनी सांगितले. “मानवी शरीरावर ही लस परिणामकारक ठरत आहे. आज प्रसिद्ध झालेल्या डाटामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला आहे” असे मीनी पँगालोस म्हणाले.