२०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाबाबत साशंकता – मोहन भागवत

0
653

नागपूर, दि. ३ (पीसीबी) – राम मंदिराच्या मुद्द्यावर पंतप्रधान  मोदी यांनी मुलाखतीत दिलेले स्पष्टीकरण आणि नुकत्याच झालेल्या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी  आगामी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाबाबत  साशंकता व्यक्त केली आहे.

नागपूरमध्ये सेवाधान शाळेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भागवत बोलत होते.

राम मंदिरावर अध्यादेश तेव्हाच आणता येईल, जेव्हा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल, असे मोदींनी मुलाखतीत स्पष्ट केले होते.  यावर प्रतिक्रिया देताना भागवत म्हणाले, पंतप्रधानांनी काहीही म्हणो यावर माझी भुमिका मात्र स्पष्ट आहे. रामाप्रती आमची आस्था असल्याने रामाचे मंदिर अयोध्येतील त्याच जागेवर बनायला हवे.

संघाचे सरकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींच्या मुलाखतीनंतर प्रतिक्रिया दिली होती. यावेळी संघाने राम मंदिराच्या उभारणीच्या कामात मोदींचे विधान सकारात्मक असल्याचे म्हटले होते. तसेच आम्ही सुरुवातीलाच राम मंदिराच्या उभारणीसाठी कायदा बनवावा, अशी मागणी केल्याचे भैय्याजी जोशी म्हणाले होते.  जोशींच्या या मागणीला भागवत यांनी पाठिंबा दर्शवला आहे.