हे सरकार आपल्याच बोजाने डुबणार – नितीन गडकरी

0
656

नागपूर,दि.५(पीसीबी) – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठाकरे सरकारवर त्यांच्या अनोख्या अंदाजात टीका केली आहे. “हे तिन्ही पक्ष आमच्या विरोधात एकवटले आहेत, याचाच अर्थ आम्ही सामर्थ्यवान आहोत”, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

केंद्रात पारित करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी आज नितीन गडकरी हे नागपुरातील जनतेशी संपर्क साधणार आहेत. यावेळी गडकरींनी शिवसेनेवर आणि सध्याच्या महाविकास आघाडी सरकारवर जोरदार घणाघात केला.

“आमच्या विरोधात हे तिन्ही पक्ष एकवटले आहेत, याचाच अर्थ आम्ही सक्षम आहोत, सामर्थ्यवान आहोत. आम्हाला काहीही अडचण नाही, आम्ही लढायला तयार आहोत. परंतू या तीनही पक्षांच्या विचारात ताळमेळ नाही. शिवसेना प्रमुख बाळा साहेब ठाकरे म्हणाले होते की, बांग्लादेशी नागरिकांना मुंबईतून बाहेर काढा. मात्र, आता शिवसेना नागरिक्त सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करायला तयार नाही. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद मिळालं म्हणून हिंदुत्व, मराठी माणूस हे सगळे विचार शिवसेने सोडून दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातला मराठी माणूस, हिंदुत्व प्रेमी जनता शिवसेनेवर नाराज आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या विचारात ताळमेळ नाही.” असंही गडकरी यावेळी म्हणाले.

“एकीकडे, शिवसेना सावरकरांना मानते, दुसरीकडे, काँग्रेस सावरकरांचा अपमान करणारं वक्तव्य करते. मात्र, शिवसेना काही करु शकत नाही. शिवसेनेला ही हतबलता, दुर्बलता जी आली आहे त्याचं कारण म्हणजे शिवसेनेने सत्तेत त्यांचं सहकार्य केलं. त्यामुळे आज त्यांना त्यांचे विचार सोडावे लागले आहेत. त्यामुळे हे सरकार आपल्या बोजाने डुबल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित”, असं म्हणत नितीन गडकरी यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला.