हिंजवडीत रिक्षामधून आलेल्या चोरट्यांनी दुचाकीस्वाराचा मोबाईल हिसकावला

0
477

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – रिक्षामधून आलेल्या दोघा चोरट्यांनी एका दुचाकीस्वाराचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेत पळ काढला. ही घटना रविवारी (दि.२) रात्री पावणेतीनच्या सुमारास हिंजवडीतील भटेवरानगर येथे घडली.

याप्रकरणी तेजस राधेशाम ठाकुर (वय २९, रा. सिग्नोर बी/५०१, भटेवरानगर, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात रिक्षाचालक आणि त्यांच्यासोबतच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावणेतीनच्या सुमारास फिर्यादी तेजस हे आपले काम आटपून हिंजवडीतील भटेवरानगर येथील रस्त्यावरुन त्यांच्या दुचाकीने घरी जात होते. यावेळी त्यांना फोन आल्याने त्यांनी दुचाकी बाजुला घेऊन मोबाईलमध्ये पाहत असताना एका रिक्षा त्यांच्या जवळ आली. त्यातील प्रवाशाने तेजसला वाकडचा रस्ता विचारला. यामुळे तेजस त्यांना रस्ता सांगत होता. इतक्यात त्याने तेजसचा मोबाईल हिसकावला आणि रिक्षातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेजसने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते दोघे चोरटे रिक्षातून मोबाईल घेऊन पसार झाले. हिंजवडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.