गडचिरोलीत बॅनर लावून नक्षलवाद्यांनी स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

0
700

गडचिरोली, दि. २ (पीसीबी) – गडचिरोलीत लॅन्ड माइन्स स्फोटानंतर दादापूर गावात नक्षलवाद्यांनी बॅनरबाजी करून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचे म्हटले आहे. या भागात रस्ते तयार करणाऱ्या कंपन्यांना आणि ठेकेदारांना धमकी देण्यात आली आहे. त्याचबरोबर या बॅनरमधून सरकारचा सर्वशक्तीनिशी विरोध करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसऱ्या एका बॅनरमध्ये या भागातील पूल-रस्ते निर्मितीला विरोध करून  सरकार भांडवलदारांचे बाहुले असल्याचा आरोप केला आहे.

नक्षलवाद्यांनी ज्या गावात हे बॅनर लावले आहेत ते हल्ल्याच्या ठिकाणावरून १० किलोमीटर अंतरावर आहे. पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.

दरम्यान, गडचिरोलीतील लेंदारी पूल भुसुरुंग स्फोटाच्या घटनास्थळी जाण्यास सलग दुसऱ्या दिवशी खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी गोठणगाव नाका येथून सुरक्षेसाठी मार्ग बंद केला आहे. याठिकाणी मोठ्या संख्येत नक्षलविरोधी पथके स्फोटस्थळी तैनात करण्यात आली आहेत. वाहन जाळपोळ आणि स्फोट या पार्श्वभूमीवर घटनास्थळी पोलीस खबरदारी घेत आहेत.