हिंजवडीत पावनेबारा लाखांचा गुटखा जप्त

0
881

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – राज्यात गुटखा बंदी असताना हिंजवडी परिसरात गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन टेम्पो मधून विविध कंपन्यांचा तब्बल ११ लाख ७५ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने सोमवारी (दि.२६) केली.

याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी हिंजवडी पोलीसांचे एक पथक हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पोलीसांना टेम्पोचालकांचा संशय आल्याने त्यांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल ११ लाख ७५ हजारांचा विविध कंपन्यांचा गुटखा आढळून आला. पोलीसांनी टेम्पोसहीत गुटखा जप्त केला.  गुटखा आणि दोन टेम्पो असा एकूण २४ लाख ७५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी अधिक तपास करत आहेत.