मुख्यमंत्री वकील असल्याने हुशार आहेत, पण आम्हीही अभ्यास करू–अजित पवार

0
767

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – राज्य सरकारला सादर केलेल्या मागासवर्ग आयोगाच्या अहवालात नक्की काय आहे, याची संपूर्ण राज्यातील जनतेला  माहिती हवी आहे. त्याचबरोबर धनगर आरक्षणाबाबतचा अहवाल आम्हालाही  वाचायला द्या, आम्हीही त्याचा अभ्यास करु. मुख्यमंत्री वकील असल्याने ते हुशार आहेत, मात्र आम्हीही अभ्यासाचा प्रयत्न करु,  आमच्याकडे अनुभव आहे, अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. ते  विधानसभेत बोलत होते.

विरोधी पक्षाचा कोणताही आमदार मराठा आरक्षणात अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेला आरोप खोटा आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. याआधीच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात विरोधकांशी सल्लामसलत करुन निर्णय घेतले आहेत. त्याप्रमाणे मुख्यमंत्री  फडणवीस यांनी पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांची परंपरा कायम ठेवावी. तसेच अहवालाबाबतचा मुद्दा त्यांनी तुटेपर्यंत ताणू नये, असेही पवार म्हणाले.

सभागृहात अहवाल सादर करणे बंधनकारक नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.मात्र, तेव्हाची परिस्थिती वेगळी आहे, आताची वेगळी आहे, असे पवार म्हणाले. तर विधानभवनावर येणाऱ्या संवाद यात्रेदरम्यान धरपकड करण्यात आलेल्यांना सोडून दिलेले नाही. त्यांच्यावरील खटलेही मागे घेतलेले नाहीत. आता त्यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी पवार यांनी केली.