हिंजवडीत उसाच्या टॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

0
729

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – पती आणि मुलीसोबत दुचाकीवरुन चाललेल्या एका महिलेला ट्रॅक्टरची जोरदार धडक बसल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.१९) रात्री साडेदहाच्या सुमारास भुमकर चौक ते लक्ष्मी चौक दरम्यान ओरीएंटल हॉटेलसमोर घडली.

विमला रमेश राठोड असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती रमेश राठोड यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, उसाच्या टॅक्टरवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भुमकर चौक ते लक्ष्मी चौक दरम्यान ओरीएंटल हॉटेलसमोरुन फिर्यादी रमेश राठोड हे त्यांच्या दुचाकीवरुन पत्नी विमला आणि मुलगी जीया यांच्यासोबत चालले होते. यावेळी उसाने भरलेल्या ट्रॅक्टरवरील चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि फरार झाला. या अपघातात रमेश यांची मुलगी जीया आणि पत्नी विमला गंभीर जखमी झाले. मात्र उपचारादरम्यान विमला याचा मृत्यू झाला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात उसाच्या टॅक्टरवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.