“हा सगळा ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालतोय का?”: ड्रग्स प्रकरणावरून मलिकांचा भाजपवर निशाणा

0
214

मुंबई, दि.११ (पीसीबी) : गुजरातच्या द्वारकामध्ये ३५० कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडल्यानंतर या मुद्द्यावरून आता वातावरण तापू लागलं आहे. यासंदर्भात आत्तापर्यंत ड्रग्ज प्रकरणावरून भाजपाकडून आरोप केले जात असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील यावरून निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावरून भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. हा सगळा ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालतोय का? असा सवाल नवाब मलिक यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

आज गुजरातच्या द्वारकामधून तब्बल ३५० कोटी किमतीचं ड्रग्ज सापडल्यामुळे आता गुजरात ड्रग्ज रॅकेटचं केंद्र बनू लागलंय का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. यावरून नवाब मलिक यांनी गुजरात सरकारमधील एका मंत्र्याचं देखील नाव घेतलं आहे. “मुंद्रानंतर द्वारकामध्ये देखील ३५० कोटींचं ड्रग्ज पकडलं गेलं. हा योगायोग आहे का? मनीष भानुशाली, धवल भानुशाली, किरण गोसावी, सुनील पाटील हे सगळे लोक वारंवार अहमदाबादमध्ये नोवाटेल आणि फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये राहिले आहेत. गुजरातचे मंत्री किरीटसिंह राणा यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. हे सगळे ड्रग्जच्या खेळाचे खेळाडू आहेत. आता असा प्रश्न उभा राहातो की ड्रग्जचा खेळ गुजरातहून तर नाही ना चालत?” असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.