…हा इशारा इतका जिव्हारी का लागला

0
226

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत ईडी चौकशांवरुन भाजपला दिलेल्या इशाऱ्यावर राजकारण चांगलंच तापलं आहे. तुम्ही चौकशा लावून सुडचक्र वापरणार असाल, तर आमच्याकडेही सुदर्शन चक्र आहे. वेळ आल्यास आम्ही ते मागे लावू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. यानंतर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपला धमकी देत असल्याचा आरोप केला. यावर आता शिवसेनेच्या नेत्या आणि विधआन परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी भाजपला चांगलंच फैलावर घेतलंय. भाजपच्या फौजा कधी महिलांना, तर कधी पत्रकारांना पुढं करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उद्धार करता, मग हा इशारा इतका जिव्हारी का लागला? असा सवाल नीलम गोऱ्हे यांनी विचारला.

भाजपची फौज कधी महिला, तर कधी पत्रकार यांना पुढे करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केवळ एकेरी भाषेत टीका करत नाहीत, तर अगदी उद्धार करतात. मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त प्रांजळ घणाघात केला, तर त्यांचे म्हणणे फडणवीस आणि भाजपच्या एवढे कां जिव्हारी लागले? मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख होत असताना तेव्हा राधासुता कुठे गेला होता तुमचा धर्म? असा सवाल नीलम गोर्हे यांनी विचारला.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “भाजप नामदार उद्धव ठाकरे यांनी धमकी दिल्याचा दावा करत आहे, पण भाजप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काय बोलत होतं? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषेला अशोभनीय म्हटले याबद्द्ल आश्चर्य वाटलं. कदाचित फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांची साम दाम दंड भेदाची भाषा विद्यमान मुख्यमंत्र्यांनी आत्मसात न केल्याने त्यांना उद्धव ठाकरेंची सुसंस्कृत आणि अरेला कारे करण्याची रोखठोक मर्हाठी पण संस्कारात्मक भाषा अशोभनीय वाटली असावी.”