स्वच्छ प्रतिमा आणि निवडूण येण्याची क्षमता विचारात घेऊनच संधी – अजित पवार

0
402

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – उद्याच्या महापालिका निवडणुकित उमेदवारी देताना अनुभवी, काही नवे चेहरे, स्वच्छ प्रतिमा, स्वच्छ चारित्र आणि निवडूण येण्याची क्षमता विचारात घेऊनच संधी देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे स्पष्ठ केले. शरद पवार साहेब यांच्या शिकवणीनुसार बेरजेचे राजकारण करणार असल्याचे सांगून भाजपा मधून मोठ्या संख्येने नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कऱणार असल्याचे त्यांनी यावेळी सुचित केले. दरम्यान, पवार यांच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारल्याचे पहायला मिळाले.

महापालिका निवडणुकिच्या पार्श्वभूमिवर सांगवी येथील निळू फुले नाट्यगृहात आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. आमदार अण्णा बनसोडे, पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह नगरसेवक, शहर पदाधिकारी, इच्छुक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती यावेळी होती. दिवसभरात अनेक मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आपल्या एक तासाच्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आता गाफिल राहुन चालणार नाही. घरचे काम थोडे बाजुला ठेवा आणि पक्षासाठी वेळ द्या. मुंबईवारी, दिल्लीवारी, पुणेवारी करत बसू नका. त्याएवजी वार्डातील मतदारांना भेटून त्यांचे प्रश्न समजून घ्या, त्यांचे मतरिवर्तन करण्याचा प्रयत्न करा. आपल्या पक्षात काही पलिकडचे लोक येण्याची शक्यता आहे. ज्यांचे इलेक्टिव्ह मेरिट आहे त्यांना आपण संधी देणार आहोत कारण प्रत्येक जागेसाठी ते महत्वाचे आहे. सुबह का भुला शाम को लौटा, असेल ते समजून घेतले पाहिजे.

लोकशाहि विरोधी ताकदींच्या विरोधात आपण संघर्ष केलाच पाहिजे, असे आवाहन करत पवार यांनी भाजपावर शरसंधान केले. ते म्हणाले, निवडणुका जवळ येत आहेत तसतसे काहि लोक वेगळ्या पद्धतीचे वातावरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. नांदेड, मालेगाव, अमरावती हे त्याचे उदाहऱण आहे. त्यांना फक्त वातावरण खराब करायचे आहे. दोन समजांत तेढ निर्माण करायची आणि अत्यंत खालच्या पातळीवरचे हिन दर्जाचे राजकारण करायचा त्यांचा प्रयत्न असतो. लोकशाही मोडून टाकण्याचा या लोकांचा डाव आहे. अशा समाजविरोधी, देश विरोधी आपण संघर्ष केला पाहिजे, असे आवाहन पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.
निवडणुकित जागावाटप करताना कोणाची किती ताकद आहे त्या प्रमाणात जागा दिल्या घेतल्या जातील असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीत काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे, पण शिवसेनेने राष्ट्रवादी बरोबर यायचे ठरवले आहे, असेही पवार यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहराचा विकास हा एकच ध्यास डोळ्या समोर ठेऊन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी वारंवार केले.