“भारताच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते आता मोदींच्या काळात घडणार!”; काँग्रेस नेत्याची जहरी टीका

0
230

मुंबई, दि.२१ (पीसीबी) : पेट्रोल व डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यावरून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. चव्हाण म्हणाले कि, ‘भारताच्या इतिहासात जे कधीही घडले नाही, ते आता मोदी सरकारच्या कारकिर्दीत घडणार असल्याचे दिसते आहे. महाराष्ट्रात पेट्रोलच्या दराचे शतक अवघे ९० पैसे दूर आहे’, असे ट्वीट करून त्यांनी या दरवाढीवर संताप व्यक्त केला.

महाराष्ट्रातील वाढत्या पेट्रोल दराचे दर अशोक चव्हाण गेले काही दिवस दररोज ट्वीट करून पेट्रोलची शंभरी जवळ आल्याचे निदर्शनास आणून देत आहेत. मात्र पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीसाठी मागील केंद्र सरकारांना जबाबदार ठरवले होते. याला सुद्धा चव्हाण यांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्याबाबत केलेल्या आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी असे लिहिले आहे कि, ‘एप्रिल २०१४ मध्ये कच्च्या तेलाची किंमत ११० डॉलर असताना मुंबईत पेट्रोल ८० अन् डिझेल ६३ रूपयांना मिळत होते. आज कच्चे तेल ६५ डॉलरला असताना मुंबईत पेट्रोल ९६.३० तर डिझेल ८७.३० रूपयांवर आहे. यासाठी केवळ मोदी सरकारची नफेखोरी कारणीभूत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त होत असताना मोदी सरकारने सतत कर वाढवले. सर्वसामान्यांच्या खिशावर तब्बल २० लाख कोटी रूपयांचा डल्ला मारला. तेच पंतप्रधान आज पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीसाठी यापूर्वीच्या सरकारांना जबाबदार धरतात, हे हास्यास्पद आहे’.

दरम्यान, फक्त अशोक चव्हाण यांनीच नाही तर त्यांचे काँग्रेसमधील सहकारी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील पेट्रोल दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी सवाल केला आहे कि, ‘देशाच्या मागणीच्या तुलनेत ८५ टक्के तेल आयात करावे लागत आहे. या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय पातळीवर निश्‍चित होते. चुकीच्या कररचनेमुळे आणि केंद्र सरकारच्या आडमुठेपणामुळे देशवासीयांना पेट्रोल, डिझेल महाग मिळत आहे. आधीच्या सरकारांनी देशातील साठ्यांचा शोध घेत तेल प्रकल्प उभारले आहेत. तुम्ही सात वर्षांत कोणते प्रकल्प उभारले?’