सोयीसुविधा पुरविल्याने शहरातील दिव्यांगांच्या मतदानाचा टक्का वाढला

0
456

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी विधानसभा मतदार संघात दिव्यांग मतदारांसाठी ने-आण करण्याची तसेच मतदान केंद्रापर्यत सहाय्यता करण्याची सोय उपलब्ध करण्यात आलेली होती. त्यामुळे दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला.

महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी यांनी या निवडणुकीसाठी दिव्यांग मतदारांसाठी तयार केलेल्या अॅपद्वारे दिव्यांग मतदारांना घरबसल्या मतदानाकरीता मतदार केंद्राची माहिती, मतदान केंद्र शोधणे, व्हीलचेअरची मागणी नोंदविणे, आदी कामे करता येतात.  चिंचवड विधानसभा मतदार संघात दिव्यांग व्यक्तींना मतदानासाठी केंद्रापर्यत ने-आण करण्यासाठी मतदानासाठी नियुक्त केलेला कर्मचारी वर्ग सहाय्य करीत होता. तसेच बुथवर पोलीस कर्मचारी दिव्यांग मतदारांना केंद्रापर्यत नेणेकामी मदत करत होते.

चिंचवड विधानसभा मतदार संघात  ५२६ दिव्यांग मतदार असून त्यात १२६अंध, मूकबधीर ,कर्णबधिर ९३, अस्थिव्यंग २४६ तर  ६१ इतर अपंग आहेत. त्यांचेसाठी  ९०  व्हिलचेअर, ४ रिक्षा,व विशेष कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आलेला होता.

चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा कुंभार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राधिका हावळ,  स्वीप ३ नोडल अधिकारी अण्णा बोदडे  आणि   पीडब्लूडी  नोडल अधिकारी संभाजी ऐवले यांचे मार्गदर्शनातून दिव्यांग मतदारासाठी  सोयीसुविधा देण्यात आल्या  होत्या.