सुरेल कवितांनी साऊ – जिजाऊ जन्मोत्सवाची सांगता

0
87

पिंपरी,दि. १३ (पीसीबी) – सुप्रसिद्ध कवी, गझलकार आणि संगीतकार विजय वडवेराव यांनी आपल्या आवाजात सादर केलेल्या वैविध्यपूर्ण गेय कवितांनी साऊ – जिजाऊ जन्मोत्सवाची सुरेल सांगता केली. श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, मळेगाव संचलित श्रीमती एस. डी. गणगे प्रशाला, त्रिवेणीनगर, तळवडे येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त साऊ – जिजाऊ जन्मोत्सव या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता शुक्रवार, दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी विजय वडवेराव यांच्या कविता – गझल मैफल या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली. श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्रमोद जगताप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप गांधलीकर, प्राचार्य एस. एस. तिकटे, उपप्राचार्य बी. यू. सातपुते, संचालक के. व्ही. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

“सर्वांना पोटभर अन्न मिळू दे…
अंगभर कपडा, निवारा छान मिळू दे!”

अशी कारुण्यपूर्ण आळवणी करणाऱ्या प्रार्थनेने विजय वडवेराव यांनी आपल्या मैफलीचा प्रारंभ केला. ‘तळपती तलवार जिजाऊ…’ या त्यांच्या रचनेने विद्यार्थ्यांना वीररसाचा प्रत्यय दिला; तर ‘शहरामधून आम्ही एकदा गावामध्ये गेलो…’ या हास्यगीताच्या माध्यमातून त्यांनी आपली फजिती कथन करताना खळखळून हसवले.

“मी बोलताच त्यानं फोडला हंबरडा”
भिडे वाडा बोलला…..!

या गीताच्या उत्कट सादरीकरणाने क्रांतिज्योती सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांचा क्रांतिकारी संघर्ष साकार केला. ‘भाकरीचं गाणं’ या कवितेच्या माध्यमातून त्यांनी आईच्या हृद्य आठवणींना उजाळा देताना श्रोत्यांच्या काळजाला हात घातला.

“लेक लाडका मी शाळेचा
शाळा माझी आई…”
या गझलेच्या सुरेल आवाजातील सादरीकरणाने वडवेराव यांनी तन्मयतेने ऐकणारे विद्यार्थी आणि आपल्यातील अंतर पुसून टाकले आणि उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद मिळवला. आपल्या मैफलीची सांगता ‘बाप आभाळाएवढा…’ या कवितेने करून त्यांनी कळसाध्याय गाठला.
प्रमोद जगताप यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून जिजाऊ माँसाहेब, सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांच्या उत्तुंग योगदानाची माहिती दिली.
श्रीमती एस. डी. गणगे प्रशालेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. दिनेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले. सामुदायिक वंदे मातरम् ने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.