सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या वाढवणार, केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय

0
444

दिल्ली, दि, ३१ (पीसीबी) – केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी लवकरच संसदेत विधेयक मांडण्यात येणार आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या (सरन्यायाधीश वगळता) ३० वरुन ३३ करण्यावर केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकमत झाले. त्यानंतर याबाबतचे विधेयक संसदेत मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०१६ मध्ये एनडीए सरकारने उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ९०६ वरुन १०७९ केली होती, अशी माहितीही यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याबाबत एक पत्र लिहिलं होते. सरन्यायाधीशांनी आपल्या पत्रात एकट्या सर्वोच्च न्यायालयात जवळपास ५८ हजार खटले प्रलंबित आहेत. जर न्यायाधीशांची संख्या वाढवली तर प्रलंबित खटल्यांची ही संख्या कमी करता येईल असे म्हटले होते. त्यामुळे केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या आजच्या निर्णयाकडे सरन्यायाधीशांच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे.