सुजय विखेंचा भाजप प्रवेश रोखणार? काँग्रेस नेत्यांची दिल्लीत खलबते

0
904

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – काँग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पूत्र सुजय विखे-पाटील मंगळवारी (दि.१२) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र, त्यांचा प्रवेश रोखण्यासाठी राज्यातील नेते दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी आज (सोमवार) सायंकाळी खल करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सुजय यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. तरी हा प्रवेश रोखण्यासाठी काँग्रेसकडून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले जाणार आहेत.  राहुल गांधी यांच्यासोबत  होणाऱ्या या बैठकीला राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थिती राहणार आहेत.

या बैठकीत राष्ट्रवादीकडे असलेली  नगरची जागा मिळवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. याबाबत  राहुल गांधी  शरद पवारांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.  या बैठकीत राज्यातील काँग्रेसच्या जागा, उमेदवार, मित्रपक्षांना सोडायच्या जागा याबाबतही चर्चा करण्यात येणार आहे. औरंगाबादच्या  जागेबाबत तिढा निर्माण झाला आहे, यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.