सिटी केअर, जीवन ज्योती, डिवाईन हॉस्पिटलवर कारवाई करा – आमदार लक्ष्मण जगताप

0
301

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – कोरोना रुग्णांना भरमसाठ बिले लावून त्यांची लूटमार करणाऱ्या हॉस्पिटवर तत्काळ कारवाईची मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील खाजगी रुग्णालयांपैकी सिटी केअर हॉस्पिटल, जीवन ज्योती हॉस्पिटल आणि डिवाइन हॉस्पिटल यांच्यावर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले आहे.

निवेदनात आमदार जगताप म्हणतात, “आपल्या सारथी तसेच पिपरी चिंचवड महापालिकेच्या ऑफिशीयल संकेतस्थळावर कोविड १९ या पथकाची कोणतीही माहिती नोंदवली गेली नाही. त्याचा नागरिकांना नाहक त्रास होताना दिसतो. नागरिकांची होत असलेली फसणूक थांबविण्यासाठी आपण आपल्या सर्व संकेत स्थळावर नागरिकासाठी कोविड १९ च्या पथकाची माहिती दूरध्वनी क्रमाक, व्हाटसअप क्रमांक उपलब्ध केल्यास नागरिकांच्या बिलासंदार्भातील समस्यांचे निवारण लवकरात लवकर होईल तसेच शहरातील खाजगी रुग्णालयातून गोरगरीब नागरिकांची होणारी लुटमार कमी होऊन खाजगी रुग्णालयांना चाप बसेल. आमच्या कार्यालयामध्ये वारंवार कोविड १९ च्या बीलासदार्भातील तक्रारी मध्ये वाढ होत असून त्यात पिंपरी-चिंचवड शहरातील सिटी केअर हॉस्पिटल, जीवन ज्योती हॉस्पिटल, डीवाइन हॉस्पिटल हे रुग्णांची बिलासाठी मोठ्या प्रमाणात पिळवणूक करतात अशा तक्रारी आहेत. या हॉस्पिटलचे व्यवस्थापन भस्म्या रोग असल्यासारखे नागरिकांकडून पैसे उकळत आहेत. तरी हे थांबविण्यासाठी संबंधित रुग्णालयावर कडक कारवाई करावी.”

राज्य शासनाच्या सुचनेनुसार २१ मे २०२० पासून खासगी हॉस्पिटलमधील सर्व बिलांचे लेखापरिक्षण केले पाहिजे. त्या संदर्भात महापालिकेने एक समिती नियुक्त केली आणि काही हॉस्पिटलला नोटीस दिली. त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. त्यांनी गरिबांना लुटायचे ठरवलेले दिसते. महापालिकेने तयार केलेल्या पथकाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे कोविड-१९ बाधित रुग्णांना खूप अडचणी येतात, असे आमदार जगताप यांनी निवेदनात नमूद केले आहे.