सिंहगड परिसरात वाघ आढळल्याची तक्रार, नागरिकांमध्ये खळबळ

0
199

पुणे, दि. १४ (पीसीबी) : सिंहगडाच्या घाट रस्त्यावर कोंढणपूर फाट्याजवळ पट्टेरी वाघ दिसल्याची तक्रार काही पर्यटकांनी गुरुवारी संध्याकाळी पोलीस आणि वन विभागाकडे केली. या भागात वाघाचा वावर नसल्याने पर्यटकांना दिसलेला वन्यप्राणी बिबट्या अथवा तरस असू शकतो, असा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री उशीरा वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने सिंहगडाच्या वनक्षेत्रात तपास केला, मात्र अंधारामुळे ठोस पुरावे आढळले नाहीत.

वाघ दिसल्याच्या तक्रारीची दखल घेत वनविभागाने स्थानिकांना दक्षतेचे आवाहन केलं आहे. वारजे माळवाडी भागात राहणारे प्रविण आणि पूजा वायचळ सिंहगडावर फिरण्यासाठी गेले होते. सायंकाळी परत येताना त्यांना कोंढणपूर फाट्यापासून काही अंतरावर वन्यप्राणी रस्ता ओलांडताना दिसला. त्यांनी आरडाओरडा केला, मात्र तो जंगलाच्या दिशेने नाहीसा झाला. दिसलेला वन्यप्राणी वाघ असल्याचा दावा या दाम्पत्याने केला आहे.

दरम्यान, आमचा तपास सुरू असून पुरावे हातात आल्याशिवाय काहीच सांगता येणार नाही, असं वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी सांगितलं आहे.