सुषमा अंधारे यांच्या जीवाला धोका

0
238

मुंबई, दि. १४ (पीसीबी) : ठाकरे गटाच्या फायर ब्रँड उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. “बाहेर पडू नका, कुणी हल्ला करेल, असं सांगितले जात आहे, माझ्या जीवाला धोका आहे,” असे अंधारे यांनी सांगितलं.

ठाकरे गटातील आक्रमक नेत्या म्हणून सुषमा अंधारे यांची ओळख आहे. त्यांनी शिंदे गट आणि भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यातले त्यांचे भाषण चांगलेच गाजले. त्याच्या क्लीप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. त्यानंतर तीन दिवसापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, “मी एका सामान्य घरातील कार्यकर्ती आहे. माझ्याकडे पैसा-आडका काही नाही. मात्र, मी कोणालाही घाबरणार नाही. राज ठाकरे यांनी मिमिक्री केल्यामुळे आतापर्यंत त्यांच्यावर किती गुन्हे दाखल केले,” असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
अंधारे यांनी आपल्या पाच वर्षांच्या बाळाबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, “माझ्या सोसायटीखाली दोन कॉन्स्टेबल येऊन बसले आणि त्यांनी मला सुरक्षा द्यायची असल्याचे सांगितले. याची माहिती मी उद्धव ठाकरे यांना दिली. याचा माझ्यावर तणाव होता. बाळाची चिंता वाटली. मात्र, त्याची जबाबरदारी घ्यायला शिवसैनिक तयार आहेत. त्यांनाच मी माझे बाळ दत्तक दिले आहे,” “माझ्यावर गुन्हे दाखल केल्याने मी गप्प बसेल, असे तुम्हाला वाटत असेल.तर तुम्ही भ्रमात आहात. जागे व्हा,” असा इशाराही त्यांनी शिंदे गटाला दिला आहे.

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. याप्रकरणी पक्षातील आठ नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेते विनायक राऊत, भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात या तिघांसह एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल झाल्यावर माध्यमांशी बोलताना अंधारे म्हणाल्या, “माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मला अजिबात आश्चर्य वगैरे काहीच वाटलं नाही. मी या सगळ्या गोष्टींसाठी मेंटली प्रीपेड होतेच. हे सगळं अपेक्षित आहे. मला नोटीस आली तर नक्की जाईन. कायदा माझ्या बापाने लिहिला आहे. माझ्या बापाने लिहिलेल्या कायद्याचा आदर मी नाही करायचा तर कुणी करायचा,”