सहकार भारतीचे त्रैवार्षिक अधिवेशन २ आणि ३ ऑक्टोबरला आळंदीत

0
502

आळंदी, दि. ३० (पीसीबी) – विधानसभेचे माजी अध्यक्ष व सहकार भारतीचे पहिले सरचिटणीस आमदार हरिभाऊ बागडे यांना स्व. माधवराव गोडबोले स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे सहकार भारतीच्या आळंदी अधिवेशनात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे यावेळी सहकार महर्षी ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाच्या ११ व्या त्रैवार्षिक अधिवेशनाचे आयोजन श्री क्षेत्र आळंदी येथे येत्या दि २ आणि ३ ऑक्टोबरला फ्रुटवाले धर्मशाळा सभागृहात करण्यात आले आहे

अधिवेशनाचे उद्घाटन दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे,सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे, आमदार हरिभाऊ बागडे व राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे.सहकार चळवळीशी संबंधित विविध विषयांवर चर्चासत्रे अधिवेशनात होणार असल्याची माहिती सहकार भारती प्रदेश अध्यक्ष डॉ. मुकुंद तापकीर, महामंत्री विनय खटावकर व राष्ट्रीय प्रचार प्रमुख भालचंद्र कुलकर्णी यांनी सांगितली

रोख रु. ५१ हजार, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील,आमदार राधाकृष्ण विखे पाटील, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंताताई उमरगेकर उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात राज्याची सहकाराची सद्यस्थिती व शासनाच्या अपेक्षा या विषयावर सहकार आयुक्त कवडे हे मार्गदर्शन करणार आहेत सहकारातून समृध्दी या विषयावर सतीश मराठे यांचे बीजभाषण होणार आहे तर दुपारी सायबर सुरक्षा व सायबर क्राईम हा परिसंवाद होईल. रविवारी महिला बचतगट व सहकार या विषयावर अंबिका महिला औद्योगिक संस्थेच्या कमलताई परदेशी यांचे मार्गदर्शन तर फळे-भाज्या प्रक्रिया विषयासंदर्भात ज्येष्ठ सल्लागार संजय ओरपे व राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. समारोप सत्रात सहकार भारती महाराष्ट्राच्या पुढील तीन वर्षांसाठीच्या प्रदेश कार्यकारीणीची निवड होणार असून सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटनमंत्री संजय पाचपोर मार्गदर्शन करणार आहेत.