सफाई कामगारांच्या वेतनावर दरोडा घालणा-या सात जणांना अटक: ते आठजण अजूनही फरार

0
329

– प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग

पिंपरी, दि.०२ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना संबंधित ठेकेदार कंपनीने पूर्ण वेतन दिले नाही. या प्रकरणी ठेकेदार कंपनीच्या संचालकासह पंधरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील सात जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र अन्य आठजण आणि इतर निश्पन्न न झालेले आरोपी अजूनही मोकाट आहेत. दरम्यान हा गुन्हा पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.

अकाउंट फायनान्स चंदन जलधर मोहंती (वय 36), मार्केटिंग रिक्रूटमेंट ऑफिसर प्रमोद उर्फ प्रमोद कुमार प्रफुल बेहुरा (वय 39), मार्केटिंग व फिल्ड ऑफिसर कार्तिक सूर्यमनी तराई (वय 51, तिघे रा. चिंचवड), सुपरवायझर नितीन गुंडोपण माडलगी (वय 46, रा. चिंचवड), विश्वनाथ विष्णू बराळ (वय 40, रा. चिंचवड), स्वप्नील गजानन काळे (वय 32), चंदा अशोक मगर (वय 40) अशी आटक केलेल्या आरोपींची नावे आहेत

अटक केलेल्या आरोपींसह संचालक हायगरीब एच गुरु (वय 60), सहसंचालक मीनाक्षी एच गुरु (वय 36, दोघे रा. भाईंदर ठाणे), मार्केटिंग व फिल्ड ऑफिसर पवन संभाजी पवार (वय 29, रा. तळवडे), सुपरवायझर बापू पांढरे (वय 35, रा. रहाटणी), अक्षय चंद्रकांत देवळे (वय 26), नंदू ढोबळे (वय 35), धनाजी खाडे (वय 40, पाचजण रा. निगडी), ज्ञानेश्वर म्हाम्बरे (वय 40, रा. चिखली) आणि इतर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पालिकेचे कामगार कल्याण अधिकारी प्रमोद श्रीरंग जगताप यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 16 डिसेंबर 2017 ते 24 जुलै 2019 या कालावधीत पिंपरी चिंचवड महापालिका येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून पिंपरी-चिंचवड महापालिके सोबत केलेल्या करारातील अटींचे पालन केले नाही. किमान वेतन कायदा व इतर अनुषंगिक कायद्यानुसार सफाई कामगारांना कामाची संपूर्ण रक्कम न देता महापालिकेची फसवणूक केली. तसेच स्वतःच्या व कंपनीच्या फायद्यासाठी सफाई कामगारांचा विश्वास संपादन करून त्यांच्या बँक फॉर्मवर सह्या व अंगठे घेतले. सफाई कामगारांची बँक खाती उघडून काही कामगारांना मिळालेले बँकेचे एटीएम कार्ड व कागदपत्रे त्यांना धमकी देऊन बळजबरीने काढून घेतले. काही कामगारांनी किमान 13 हजार रुपये पगार द्यावा अशी मागणी केल्याने त्यांना कामावरून कमी करण्यात येईल अशी धमकी दिली. कामगारांचे बँकेचे एटीएम व कागदपत्रे आरोपींनी स्वतःजवळ असल्याचा फायदा उचलून अद्यापपर्यंत प्रत्येक महिन्याला प्रत्येक कामगाराकडून चार हजार रुपये खंडणी मिळवली. अकुशल कामगारांना प्रत्यक्षात मिळणारे किमान वेतन न देता ते कमी प्रमाणात रोख स्वरूपात देऊन कामगारांचा विश्वासघात केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

अटक न केलेल्या आरोपींमध्ये माजी नगरसेवक तानाजी खाडे यांचा भाऊ धनाजी खाडे याचाही समावेश आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे