नगरसेवक शैलेश मोरेंच्या वाढदिवस फलकांवरून भाजपा गायब, राष्ट्रवादीत जाण्याचे संकेत

0
833

– भाजपातील आजी-माजी नगरसेवकांची गळती सुरूच

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – भाजपा मधील आजी-माजी नगरसवेकांचे पक्षांतर आगामी काळात वेगात होणार, अशी लक्षणे दिसत आहेत. दोन आठवड्यापूर्वी आमदार लक्ष्मण जगताप यांचे खंदे समर्थक असलेले माजी नगरसवेक राजू रामा लोखंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि भाजपाला सोडचिठ्ठी दिली. महापालिकेतील भाजपाच्या सत्ता काळात आजवर एकही महत्वाचे पद न मिळालेले तब्बल २२ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. दोन महिन्यांत एक एक करत ते राष्ट्रवादीत प्रवेश कऱणार असल्याचे सांगण्यात आले. भाजपाला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांपैकी सर्वजण राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याचे वृत्त आहे. आगामी महापालिका निवडणुकिच्या पार्श्वभूमिवर नगरसेवकांच्या संभाव्य पक्षांतरामुळे भाजपामध्ये सद्या प्रचंड अस्वस्थता आहे. नगरसवेक शैलेश मोरे यांनी स्वतःच्या वाढदिवसा निमित्त वर्तमानपत्रांत पूर्ण पान जाहिरात केली तसेच शहरातील प्रमुख चौकांतून भले मोठे होर्डींग्ज लावले असून कुठेही भाजपाचे चिन्ह, मोदी, फडणवीस अथवा स्थानिक नेते म्हणून आमदार लक्ष्मण जगताप अथवा महेश लांडगे यांचा फोटो वापरलेला नाही. त्याएवजी माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नते आझमभाई पानसरे यांच्याबद्दल ऋण व्यक्त केले आहेत. शैलेश मोरे यांची पावलेसुध्दा राष्ट्रवादीच्या दिशेने पडत असल्याचे समजले. स्वतः ते या विषयावर मौन धरून आहेत.

महापालिकेत १२८ पैकी ७७ नगरसेवक भाजपाचे, ३६ राष्ट्रवादी, ९ शिवसेना, १ मनसे आणि ७ अपक्ष असे संख्याबळ आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे या पक्षाची पुरती बदनामी झाली. स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे याच्यावर लाचलुचपतने कारवाई केल्यानंतर भाजपाची प्रतिमा मलिन झाली. सुरवातीपासून महत्वाच्या पदांचे (महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, पक्षनेता आदी) वाटप करताना आमदार जगताप आणि लांडगे यांच्या समर्थकांनाच संधी मिळाली. त्यातही फक्त भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या जवळच्या नगरसेवकांनाच पदे मिळाल्याने नाराजी वाढत गेली. राष्ट्रवादीतून भाजमध् आलेल्या अनेक जेष्ठ नगरसवेकांनाही आज अखेर कोणतेही पद मिळाले नाही. अशा तब्बल २२ भाजपा नगरसेवकांची यादी राष्ट्रवादीच्या हातात आहे. त्याशिवाय स्वबळावर विजयी होऊ शकतात अशा सुमारे २५ ते ३० माजी नगरसवेकांनी आगामी उमेदवारीसाठी भाजपाला नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसला विचारणा केल्याने वारे कोणत्या दिशेने वाहते ते लक्षात येते.