सदाभाऊ खोत यांचा महाआघाडी सरकारवर हल्लाबोल

0
229

मुंबई, दि. १३ (पीसीबी) : सहकारी साखर कारखान्याच्या मुद्द्यावरुन माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. राज्यातील 55 सहकारी साखर कारखान्यांची विक्री करण्यात आली. हे कारखाने काही खासगी कंपन्यांकडून कवडीमोल पैशातून खरेदी करण्यात आले. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, मेधा पाटकर आणि अन्य नेते, समाजसेवकांनी आझाद मैदानातून कारवाईची मागणी केली होती. मात्र, शेकडो कोटी रुपये किमतीचे साखर कारखाने कवडीमोल भावाने विकले गेल्याचा आरोप सदाभाऊ यांनी आज मुंबईत केलाय. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे व्यवहार राज्य शिखर बँकेकडून झाले होते. शेकडो कोटी रुपये किमतीच्या सहकारी साखर कारखान्यांची विक्री कवडीमोल भावानं झाली. या कारखानदारांनी दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा टाकला. यात राज्याचे तब्बल 1200 कोटी रुपयांचे भाग भांडवल अडकलं आहे. हे कारखाने पुन्हा सहकारी होणं गरजेचं आहे. या कारखान्यासंदर्भात झालेल्या खरेदी विक्री व्यवहाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केलीय.

7 कोटी रुपरांना खरेदी केलेल्या साखर कारखान्यावर 400 कोटी रुपयांचं कर्ज दिलं जातं. जरंडेश्वर साखर कारखान्यावर झालेल्या कारवाईनंतर ऊस कुठे घालवावा असा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडला आहे. या कारखान्यावर प्रशासक नेमावा आणि शेतकऱ्यांचं नुकसान थांबवावं, अशी मागणीही खोत यांनी केलीय. त्याचबरोबर सहकार क्षेञात झालेल्या घोटाळ्याबाबत आम्ही केंद्रीय सहकार मंञी अमित शहा यांची भेट घेऊन पञ देणार आहोत. या क्षेञात झालेल्या घोटाळ्याबाबत चौकशीची मागणी आपण करणार असल्याची माहितीही खोत यांनी दिलीय.

जरंडेश्वरवरील कारवाईबाबत अजित पवारांची भूमिका
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीनं केलेल्या कारवाई संदर्भात भूमिका स्पष्ट केली. ‘आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो सुंदरबाग सोसायटीने याचिका दाखल केली होती. 14 कारखान्यांमध्ये जरंडेश्वर कारखाना होता. सर्व रीतसर परवानग्या घेतल्या होत्या, माझ्याच नातेवाईकांचा तो कारखाना आहे. ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. सीआयडीने चौकशी केली त्याच्यातून काही निष्पन झालं नाहीय, सगळीकडून पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत. त्यासंदर्भात ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं आहे तिकडे जाणार, वकिलांचा सल्ला घेऊन अपिलामध्ये जाऊ’, असं अजित पवार म्हणाले.