“…सगळा घरी बसून कारभार चालवल्याचा हा परिणाम आहे. कोरोना महामारीवर ‘या’ नेत्याने ओढले मुख्यमंत्र्यांवर ताशेरे

0
347

मुंबई, दि.१७(पीसीबी) : कोरोनाच्या महामारीमध्ये सुद्धा गणेशोत्सवात बाजारपेठांमध्ये गर्दी, टाळेबंदी शिथिलीकरणाबरोबर मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतराबाबत सुटलेले भान यामुळे ऑगस्टमध्ये ओसरू लागलेला करोनाचा संसर्ग मुंबईत पुन्हा वाढू लागला आहे. शहरात प्रत्येक दिवशी केल्या जाणाऱ्या चाचण्या आणि आढळलेले बाधित रुग्ण याचे प्रमाण ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये जवळपास १० टक्क्यांनी वाढले. त्यामुळे बाधितांचे प्रमाण १७ ते २० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. यावरून आता भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

भातखळकर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त करत ट्विट केलं आहे कि, “मुंबईतील करोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून रुग्णवाढीचा वेग चिंताजनक झाला आहे. राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेने वारंवार नियमात केलेले बदल, अंमलबजावणीतील शिथिलता, रुग्ण संख्या लपवण्यासाठी कमी केलेल्या चाचण्या आणि घरी बसून चालवलेला कारभार याचा हा परिणाम आहे,”

मुंबईत प्रतिदिन रुग्णसंख्या सर्वसाधारणपणे एक हजार किंवा त्याहून कमी नोंदली जात होती. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात दर दिवशी सुमारे सात ते नऊ हजार चाचण्या होत होत्या आणि बाधितांचे प्रमाण सुमारे १० ते १२ टक्के होते. पुढील आठवडय़ात हे प्रमाण जवळपास १५ टक्क्यांपर्यंत पोहोचले. दर दिवशी चाचण्यांची संख्या दहा हजारांहून अधिक केल्याने रुग्णसंख्या वाढल्याचा दावा पालिकेने केला तरी चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण १७ ते २० टक्क्यांवर गेल्याचे आकडेवारीतून समोर आले.