संभाजी भिडे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल; गुन्हा नोंदविण्याची याचिकेत मागणी

0
471

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने जवळपास दीडशे जोडप्यांना मुलगे झाले. ज्यांना मुलगा हवा होता, त्यांना मुलगाच झाला, संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्यापेक्षाही मनु श्रेष्ठ होते, अशी बेधडक वक्तव्ये करून समाजात खळबळ उडवून देणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे हे आता कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत.

अशी बेताल वक्तव्ये करून भिडे यांनी राज्यघटना व कायद्याचे उल्लंघन केले असल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा विनंतीची याचिका संजय भालेराव यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

भिडे यांना अशी घटनाबाह्य व कायद्याचा भंग करणारी विधाने करण्यास प्रतिबंध करण्यात यावा. राज्यघटनेतील अनुच्छेद १९ मधील उपकलम १, २, ३, ४ व ५ मधील तरतुदींखाली त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत. त्याचबरोबर पुत्रप्राप्तीबाबत दावा करत त्यांनी प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएनडीटी) भंग केला असल्याने या कायद्यातील कलम २८ अन्वये गुन्हा नोंदवण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे.