पवना धरण @ ५० टक्के; मावळपट्ट्यातील चांगल्या पावसामुळे पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा

0
543

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार पावसाची प्रतीक्षा असली तरी मावळपट्ट्यात गेल्या १५ दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. पवना धरणाचा पाणीसाठा ५० टक्क्यांवर पोचला आहे. त्यामुळे सहा महिने तरी पिंपरी-चिंचवडच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पावसाळ्याचे अजून अडीच महिने बाकी आहेत. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवना धरण १०० टक्के भरेल आणि पिंपरी-चिंचवडकरांची यंदाच्या उन्हाळ्यातील परिस्थितीप्रमाणेच पुढील वर्षाच्या उन्हाळ्यातही पाणीकपातीतून सुटका होईल, अशी आशा आहे.

राज्यात सर्वत्र पावसाचा जोर असला तरी पिंपरी-चिंचवडमध्ये अजून चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विशेष म्हणजे मावळपट्ट्यात पावसाचा जोर चांगला आहे. त्यामुळे मावळ भागातील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. या भागात समाधानकारक पाऊस होत असल्याने येथील धरणांना आणि शेतकऱ्यांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणीसाठा ५० टक्क्यांवर पोचला आहे.

त्यामुळे पिंपरी-चिंचवडची पुढील सहा महिन्याची तहान भागेल, एवढा हा पाणीसाठा आहे. सध्या पवना नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नदीपात्रातील उपलब्ध पाणीसाठ्यातून पुरेसे पाणी उचलून ते शहरवासीयांना पुरविले जात आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात येत्या काही दिवसांत आणखी वाढ होणार आहे. पावसाळ्याचे अजून अडीच महिने बाकी आहेत. त्यामुळे या कालावधीत चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. परिणामी पवना धरण १०० टक्के भरेल आणि येत्या उन्हाळ्यात शहरावर पाणीकपातीचे संकट येणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.