संधी मिळताच पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना जनता धडा शिकवते,नरेंद्र मोदीचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला

0
370

मुंबई, दि.९ (पीसीबी) –संधी मिळताच पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना जनता धडा शिकवते, असे विधान करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आज कर्नाटक मधील पोटनिवडणुकांचा निकाल लागला. यात भाजपचा दमदार विजय झाला आहे. १५ जागांवर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला ६ जागांवर विजय मिळाला आहे तर ६ जागांवर आघाडी घेतली आहे. कर्नाटकच्या विजयाची संधी साधत मोदींनी शिवसेनेवर निशाणा साधला असल्याचे दिसत आहे.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले, कर्नाटक पोटनिवडणुकीचा निकाल हा देशातील सर्वच राजकीय पक्षांसाठी संदेश आहे की, जर कोणी जनादेशाच्या विरोधात जात असेल आणि लोकांचा विश्वासघात करत असेल, जनतेच्या पाठीत खंजीर खुपसत असेल तर संधी मिळताच लोक त्याला उत्तर देतात, असं म्हणत मोदींनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
त्यानंतर ते म्हणाले, कर्नाटकमध्ये आता स्थिर आणि मजबूत सरकार असणार आहे. झारखंडच्या लोकांनीही लक्षात ठेवायला हवं की काँग्रेस कधीच आघाडीचा धर्म निभावत नाही. काँग्रेसने नेहमीच आपल्या स्वार्थासाठी आघाडी आणि जनमताचा वापर केला आहे. त्यानंतर स्वतःच्या हितासाठी मित्र पक्षांचा वापर करून घेते. याचा परिणाम म्हणजे लोकांना कधीही चांगलं सरकार मिळत नाही , असेही ते यावेळी म्हणाले.