संतापजनक: धावत्या रिक्षामध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

0
1848

दिल्ली, दि. २ (पीसीबी) – राजधानी दिल्लीतील गुरुग्राम येथे एका ४२ वर्षांच्या महिलेवर चालत्या रिक्षामध्ये रिक्षाचालक आणि त्याच्या चार साथीदारांनी  सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी पीडित ४२ वर्षीय महिलेने पोलिसात फिर्यादी दिले आहे. त्यानुसार, गुरुग्राम पोलिसांनी अंकित, दीपक, महिपाल, अजित आणि सुन्नू  या पाच रिक्षाचालकांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ४२ वर्षीय महिला ही दिल्लीत राहते. तिच्या पतीचे २०१३ मध्ये निधन झाले आहे. गुरुग्राम येथील आयएमटी मानेसरमधील एका कंपनीशी महिलेचा आर्थिक वाद होता. संबंधित कंपनीने पतीच्या निधनानंतर पैसे थकवले होते आणि यासंदर्भातच महिला शनिवारी गुरुग्रामध्ये आली होती. शनिवारी दुपारी महिलेने नाखरोला चौक येथून आयएमटी मानेसर येथे जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षा अंकित चालवत होता तर दीपक हा आधीपासूनच रिक्षेत बसला होता. मात्र, त्या दोघांनी आयएमटी मानेसर येथे रिक्षा न नेता दीपकच्या घराच्या दिशेने नेली. दीपकच्या घराबाहेर आधीपासूनच एक व्यक्ती थांबला होता. या तिघांनी महिलेला खेचत दीपकच्या घरात नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

यानंतर त्यांनी महिलेला रामपुरा मोड येथे आणखी दोन रिक्षा चालकांकडे सोपवले. त्या दोघांनी मित्राला बोलावून घेतले. त्यांचा मित्र एक तास रिक्षा फिरवत होता आणि ते दोघे मागच्या सीटवर धावत्या रिक्षेत महिलेवर बलात्कार करत होते. रिक्षा चालवणाऱ्या तरुणानेही महिलेशी असभ्य वर्तन केले. शेवटी रात्री उशिरा त्यांनी महिलेला रामपुरा फ्लायओव्हर खाली सोडून दिले. महिला  बेशुद्धावस्थेत होती. तिच्याकडील मोबाईलही हरवला होता. रविवारी सकाळी एका नागरिकाने तिला पाहिले आणि या घटनेची महिती पोलिसांना देण्यात आली. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वेगाने तपासाचे चक्रे फिरवली आणि अंकित, दीपक, महिपाल, अजित, सुन्नू या पाच जणांना अटक केली. सर्व नराधम हे रिक्षाचालक आहेत.