येत्या काही दिवसांत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा खातेबदल ?

0
917

मुंबई, दि. २ (पीसीबी) – राज्यातील फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा येत्या काही दिवसांत विस्तार किंवा खातेबदलाची शक्यता  सूत्रांनी व्यक्त केली आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची जुलैमध्येच विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपली आहे. त्याला आता सहा महिने होत आहेत. त्यामुळे दीपक सावंत यांच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक लवकरच करावी लागणार आहे. कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार सध्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे कृषीमंत्री पदाची जबाबदारी दुसऱ्या कोणाकडे तरी  द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर  काही महामंडळाच्या नेमणुकाही करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. 

गेल्या अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, या विस्ताराला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. आगामी लोकसभा आणि राज्यसभा निवडणुका  तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्य़ामुळे हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असू शकतो. तर  दुसरीकडे भाजप नेते एकनाथ खडसे यांचे  मंत्रिमंडळात पुनरागमन होणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची  मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला नाराज न करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. शिवसेनेला विस्तारात झुकते माप देण्यास भाजप श्रेष्ठी अनुकूल आहेत. कारण यावर युतीचे भवितव्य अवलंबून आहे, याची जाणीव भाजपला आहे. त्यामुळे सध्या तरी  इच्छुक आमदारांचे विस्ताराकडे डोळे लागले आहेत.