संजय गांधी निराधार योजनेच्या 50 लाभार्थ्यांना पेन्शनपत्राचे वाटप

0
245

पिंपरी,दि.०२(पीसीबी) – चिंचवड विधानसभा संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीने श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या 50 लाभार्थ्यांना पेन्शनपत्राचे मंगळवारी (दि. 1) भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यामध्ये 30 विधवा महिला, 10 ज्येष्ठ नागरिक, 8 अपंग तसेच 2 मूकबधीर व कर्णबधीर लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे या लाभार्थ्यांना मिठाई सुद्धा देण्यात आली. या शासकीय योजनेच्या लाभामुळे आमची दिवाळी गोड झाल्याचे समाधान लाभार्थ्यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी महापौर माई ढोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, एकनाथ पवार, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, माजी प्रभाग स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, संदीप गाडे, चिंचवड विधानसभा संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष नरेंद्र माने, संजय गांधी योजना विभागाचे लिपीक भीमाशंकर बनसोडे, संजय मराठे, दिलीप गडदे, टाटा मोटर्सचे कामगार प्रतिनिधी नामदेव शिंत्रे, सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी जगताप, कुंदा गडदे, रवि खोकर, पंकज सारसर आदी उपस्थित होते.

शंकर जगताप म्हणाले, “ समाजातील शोषित व वंचितांसाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत अनेक लाभाच्या योजना राबवल्या जातात. अनेक नागरिकांना या योजनांची पुरेशी माहिती नसते. त्यामुळे योजनांचा सामान्यांना लाभ मिळाला यासाठी सतत प्रयत्न करणे गरजेचे असते. चिंचवड विधानसभा संजय गांधी निराधार समिती वंचित व शोषितांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने परिश्रम घेत आहे. त्यामुळेच श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचा चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचला आहे.

लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपल्या आसपासच्या नागरिकांनाही या योजनेबाबत माहिती देऊन जनजागृतीचे काम केले पाहिजे. त्यातून एकमेकाला सहाय्य होईल. तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघात वास्तव्याला असलेल्या आणि श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी संजय गांधी निराधार योजना समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.”