शेतकऱ्यांची सरकारी मदत रेंगाळणार नाही, याची काळजी घ्या – उध्दव ठाकरे

0
428

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – दुष्काळ जेवढा गंभीर तेवढीच ‘दुष्काळ दिरंगाई’देखील गंभीर ठरते. त्यामुळे रेंगाळलेल्या मान्सूनप्रमाणे  शेतकऱ्यांची सरकारी मदत रेंगाळणार नाही,  याची काळजी सरकारने घ्यायला हवी असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

राज्यातील ९ हजार गावे दुष्काळी मदतीपासून वंचित राहिली असतील, तर त्याचीही दखल सरकारने तातडीने घ्यावी. या गावांतील शेतकऱ्यांना शासकीय अर्थसहाय्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र अद्याप ते ‘लाल फिती’तच अडकून पडले आहे. सरकारने निदान आता तरी हे पेंड खात असलेले मदतीचे घोडे हलवावे आणि ९ हजार गावांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकारी मदतीचा प्रस्ताव मार्गी लावावा,  असे अग्रलेखात म्हटले आहे.

दुष्काळग्रस्त जनता आणि शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे उपाय अमलात आणले जात आहेतच, पण तरीही राज्यातील ९ हजार गावे दुष्काळी मदतीपासून वंचित राहिली असतील.  तर त्याचीही दखल सरकारने तातडीने घ्यावी. दुष्काळ जेवढा गंभीर तेवढीच ‘दुष्काळ दिरंगाई’देखील गंभीर ठरते. त्यामुळे रेंगाळलेल्या मान्सूनप्रमाणे या गावांतील शेतकऱ्यांची सरकारी मदत रेंगाळणार नाही याची काळजी सरकारने घ्यायला हवी. मान्सूनने आता श्रीलंकेत प्रवेश केल्याचे शुभ वर्तमान दिलेच आहे. राज्यातील ९ हजार दुष्काळग्रस्त गावांतील शेतकऱ्यांनाही अर्थसहाय्याचे शुभ संकेत सरकारकडून लवकरच मिळेल, अशी खात्री आहे.