शेतकरी आंदोलनादरम्यान गोंधळ घालणाऱ्यांना तुरुंगात टाका; शेतकरी नेत्यांचं केंद्र सरकारला उत्तर

0
168

दिल्ली, दि. १२ (पीसीबी) : राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात काही असामाजिक घटक, डावे आणि माओवादी घुसल्याचा आरोप केंद्र सरकारकडून होत आहे. याला आता शेतकऱ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आंदोलनादरम्यान अनागोंदी माजवणाऱ्या असामाजिक घटकांना, गोंधळ निर्माण करणाऱ्या लोकांना थेट तुरुंगात टाका, असे आवाहन शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारला केले आहे. असामाजिक घटक, डावे आणि माओवाद्यांनी शेतकरी आंदोलन हायजॅक केले असल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे.

भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, “शेतकऱ्यांना त्यांच्या आंदोलनात कोणी असामाजिक घटक घुसल्याची कोणतीही कल्पना नाही. सरकार म्हणतंय त्याप्रमाणे जर कोणत्याही असामाजिक घटकांनी आमच्या आंदोलनात घुसखोरी केली असेल तर केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांनी त्यांना पकडायला हवं. जर कोणत्याही प्रतिबंधित संघटनेचे लोक शेतकरी आंदोलनात घुसले असतील, ते आमच्यात वावरत असतील, तर त्यांना तुरुंगात डांबायला हवं. जर आम्हाला असे लोक या आंदोलनात कुठे दिसले तर आम्ही स्वतःच त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देऊ”.असं देखील ते म्हणाले