शुक्रवारी मी स्वतःच ईडी कार्यालयात जाऊन ‘पाहुणचार’स्वीकारणार – शरद पवार

0
475

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – ईडीने माझ्यासंदर्भात शिखर बँक प्रकरणात जो गुन्हा दाखल केला आहे. त्या गुन्ह्याच्या संदर्भात मी माझी स्वतःची भूमिका अशी आहे की मी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार.  नक्की गुन्हा काय केला ते मला समजून घेतले पाहिजे असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. संपूर्ण महिनाभर मी निवडणूक प्रचारासाठी वेळ देणार आहे. त्यामुळे माझे वास्तव्य मुंबईच्या बाहेर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता ईडीच्या ऑफिसमध्ये मी स्वतः जाणार आहे. तिथे जाऊन ईडीचा ‘पाहुणचार’ स्वीकारणार आहे असाही टोला शरद पवार यांनी लगावला.  तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांना माझ्याबाबत जी माहिती हवी असेल ती देईन असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. मंगळवारी संध्याकाळी ईडीने शिखर बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.  यासंदर्भातच शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर माझा पू्र्ण विश्वास आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

” मी राज्य सहकारी बँकेचा कधीही संचालक वा सदस्य कधीच नव्हतो असेही त्यांनी सांगितले. मी महिनाभर राज्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार आहे, त्यामुळे ईडीला माझी गरज लागली तर नी एकदम अदृष्य झालो असं वाटू नये म्हणून मीच ईडीच्या मुंबईतील कार्यालयात दाखल होणार असल्याचे पवारांनी सांगितले.”

दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा संस्कार या महाराष्ट्राला शिकवलेला नाही, अशी कोपरखळीही पवार यांनी कुणाचे नाव न घेता मारली. अशा प्रकारची कारवाई होण्याचा माझ्यावरील हा दुसरा प्रसंग असे त्यांनी सांगितले. १९८० मध्ये अमरावतीमध्ये एका शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मला अटक करण्यात आलीली होती मात्र माझ्या बाजुने निकाल लागला व प्रश्न शिल्लक राहिला नाही असे ते म्हणाले.