शीख दंगलीसंदर्भातील वक्तव्याबद्दल सॅम पित्रोडा यांनी माफी मागितली पाहिजे – राहुल गांधी

0
476

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – दिल्लीत १९८४ साली घडलेल्या शीख विरोधी दंगलीसंदर्भात सॅम पित्रोडा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपले मौन सो़डले आहे. सॅम पित्रोडा यांनी अयोग्य वक्तव्य केले असून त्यांनी माफी मागितली पाहिजे असे राहुल गांधी यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे. राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याआधीच सॅम पित्रोडा यांनी दिलगीरी व्यक्त केली.

देशात अजून दोन टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीचे मतदान बाकी आहे. सॅम पित्रोडा यांनी शीख विरोधी दंगलीसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यात फटका बसू शकतो. पित्रोडा यांच्या वक्तव्यावरुन भाजपाने काँग्रेसला कोंडीत पकडले आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

१९८४ सालच्या शीख विरोधी दंगल प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे. जे कोणी याला जबाबदार आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माझी आई सोनिया गांधी यांनी माफी मागितली आहे. १९८४ साली जे घडले ते भयंकर दु:खद होते. असे पुन्हा घडता कामा नये. सॅम पित्रोडा जे म्हणाले ते अयोग्य आहे. मी याबद्दल त्यांच्याशी थेट बोलणार आहे. त्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे असे राहुल यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.