मोहन भागवत आणि उद्धव ठाकरेंमध्ये अजूनपर्यंत चर्चा झालेली नाही – संजय राऊत

0
325

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – महाराष्ट्रात सरकार स्थापनेसंबंधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी गुरुवारी स्पष्ट केले. आज मातोश्रीवर नवनिर्वाचित शिवसेना आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे.

शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार दगाफटका करणार नाहीत अशा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. तुम्ही पक्षाची भूमिका मांडत आहात का? या प्रश्नावर राऊत यांनी मी उद्धव ठाकरेंचे विचार मांडत आहे असे उत्तर दिले.

अडीचवर्ष मुख्यमंत्रीपदासह समान खातेवाटपावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्ष सुरु आहे. त्यामुळे निकाल लागून १० दिवस उलटले तरी अजून सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याची शिवसेनेची मागणी भाजपाने फेटाळून लावली आहे. महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन होईल असा भाजपा नेत्यांचा दावा आहे.

भाजपा सरकार स्थापनेचा दावा करणार असेल तर ती चांगली गोष्ट आहे असे शिवसेना नेते संजय राऊत काल म्हणाले. मोठा पक्ष म्हणून भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा करुन सरकार बनवले पाहिजे. राज्यपालांना ते १४५ आमदारांच्या पाठिंब्याची यादी देणार असतील तर ती आनंदाची बाब आहे असे राऊत म्हणाले.