शिवसेना-भाजप चौकातील कुत्र्यांसारखे भांडत आहेत –धनंजय मुंडे

0
621

ठाणे, दि. १६ (पीसीबी) –  शिवसेना आणि भाजप  हे दोन्ही पक्ष गेल्या साडेचार वर्षांपासून केंद्र, राज्य आणि महापालिकांमध्ये एकत्र  संसार  करत आहेत. मात्र,  हे दोघेही चौकातील कुत्र्यांसारखे एकमेकांशी भांडत आहेत, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादीचे नेते व  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे यांनी शिवसेना-भाजपच्या युतीतील वादावर  केली आहे.

आगामी लोकसभा  निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी-काँग्रेसने राज्यात परिवर्तन निर्धार यात्रा काढली आहे. यानिमित्त अंबरनाथ येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना  मुंडे यांनी शिवसेना आणि भाजप यांच्यातील भांडणाचा खरपूस समाचार घेतला.

दात आणि नखे काढलेल्या खेळण्यासारखी सध्या महाराष्ट्रातील एका वाघाची अवस्था झालेली पाहवयास मिळत आहे, अशा शब्दांत  शिवसेनेचं नाव न घेता मुंडे यांनी शिवसेनेला टोला लगावला. शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये युती होणार की नाही, अशी संभ्रमावस्था आहे. तर शिवसेनेकडून भाजपवर सतत टीकास्त्र सोडले जात आहे. भाजप युतीसाठी आग्रही असला तरी, शिवसेनेने आपले पत्ते अद्याप उघडे केलेले नाहीत.