शिवतीर्थ मैदान बचाव साठी स्वाक्षरी मोहीम

0
238

निगडी, दि. २९ (पीसीबी) – भक्ती शक्ती शिल्पाचे व उद्यानाचे जेव्हापासून लोकार्पण झाले तेव्हापासून पेठ क्रमांक 24 सर्वे नंबर 12 13 व 14 निगडी प्राधिकरण या मोकळे जागेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आठवडाभर विविध समाजप्रबोधनाचे कार्यक्रम होतात. या ठिकाणी आत्तापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका व भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समिती यांच्यामार्फत पालिका खर्चाने घेण्यात आलेले आहेत.

याच जागेमध्ये महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून ही सर्व जागा लेवल करून सुस्थितीत ठेवण्यात आली, वारंवार या जागेसाठी लाखोंचा खर्च करण्यात आला. याच जागेवर अनेक वर्षापासून शहरातील सर्वात मोठी शिवजयंती म्हणून 300 ते 400 कलाकारांचे महानाट्य येथे पेठ क्रमांक 24 सर्वे नंबर 12,13 व 14 या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत.

शहरातील भक्ती शक्ती हे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भक्ती आणि शक्तीचा मिलाप दाखवणारे गुरु-शिष्यांचे महत्त्वाचे ठिकाण आहे.या उद्यानाला लागून ही जागा आहे. या जागेच्या आजूबाजूचा परिसर पूर्णपणे सिमेंटच्या जंगलाने व्यापला आहे.प्राधिकरण निगडी येथील असणारी ही मोकळी जागा शहराचे प्रमुख प्रवेशद्वार व आकर्षण असणाऱ्या या भक्ती शक्ती उद्यानालगत आहे. याच जागेवर शिवसृष्टी उभारण्यात यावी व ही जागा पूर्णपणे मोकळी ठेवण्यात यावी जेणेकरून या जागेवर शिवजयंती उत्सव, संत तुकाराम महाराज जयंती उत्सव,अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव, अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव, मोहम्मद पैगंबर जयंती या सर्व महापुरुषांच्या जयंती उत्सवासाठी ही जागा वापरण्यात येईल.तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्ग लगतीची ही जागा असल्याने ही जागा पालखी विसाव्या दरम्यान सुद्धा वारकऱ्यांच्या विसाव्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शहरातील खेळांची मैदाने संपली असल्याकारणाने ही जागा शहरातील मुलांसाठी तरुणांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

यासाठीचा पीएमआरडीए व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार व मागणी करून सुद्धा ही जागा फक्त पैसा कमावण्याच्या उद्देशाने बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घालण्याचे काम प्रशासन अधिकारी करीत आहेत. या विरोधात पिंपरी चिंचवड व परिसरात हा लढा आणखी तीव्र करण्यासाठी भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समिती व छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने 28 एप्रिल 2023 ते 3 मे 2023 हे पाच दिवस स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे याची सुरुवात काल झाली.यावेळी जयंती उत्सव समितीचे मारुती भापकर,सचिन चिखले,धनाजी येळकर पाटील,भाऊसाहेब आढागळे, संतोष जी वाघे, गणेश भांडवलकर, प्रकाश जाधव,किशोर अट्टरगेकर,मोईन शेख, गणेश सरकटे,सुरज ठाकर,सचिन आल्हाट, इत्यादी सह असंख्य नागरिक उपस्थित होते.या स्वाक्षरी मोहिमेत पिंपरी चिंचवड मधील नागरिकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे आवाहन छावा मराठा युवा महासंघ व भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समिती यांच्यावतीने करण्यात आली आहे.