“शहरातील लहान मुलांचे हॉस्पीटल्स महापालिकेच्या नियंत्रणात आणा”: महापौर उषा उर्फ माई ढोरे

0
280

पिंपरी, दि.२५ (पीसीबी) :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग लहान मुलांवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही शक्यता लक्षात घेता पिंपरी चिंचवड शहरातील लहान मुलांचे सर्व खाजगी हॉस्पीटल्स महापालिकेच्या नियंत्रणात आणावेत, त्याबाबत त्वरीत कार्यवाही सुरु करावी असे निर्देश महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिले. कोरोना व म्युकर मायकोसिस रुग्णांच्या संदर्भात आमदार तथा भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या उपस्थितीत आयुक्त कार्यालयात आज बैठक घेण्यात आली. यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती ॲड नितीन लांडगे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, चेतन घुले, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, डॉ. लक्ष्मण गोफणे उपस्थित होते.

कोरोनाचा संसर्ग लहान मुलांना होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे करीता त्वरीत निर्णय घेणे गरजेचे असून शहरातील लहान मुलांचे हॉस्पीटल्स, डॉक्टर, पदाधिकारी व प्रशासनाची बैठक बोलवून याबाबत योग्य ते नियोजन आखावेत. लहान मुलांना आवश्यक असणारे लसीकरण त्याचबरोबर बालकांसाठी एनआयसीयुची तयारी ठेवावी. यासाठी लागणाऱ्या औषधांसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. तसेच शहरात आढळणाऱ्या म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर प्राधान्याने लक्ष ठेवून त्यांचेवर त्वरीत योग्य ते उपचार करणेबाबत दक्षता घेण्यात यावी. असेही महापौर यांनी आयुक्तांना सुचित केले.

बैठकीत आमदार महेशदादा लांडगे यांनी देखिल कोरोना संदर्भात करावयाच्या उपाययोजनाबाबत प्रशासनाला सुचना केल्या. ते म्हणाले, शहरातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. ही समाधानाची बाब असली तरी तिसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. याबाबत वेळीच पावले उचलणे आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांचे टेस्टींग करण्यास प्राधान्य देऊन त्यात आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरण अनिवार्य करावे. रुग्णांचे मनोधैर्य वाढण्यासाठी त्यांचेसोबत समुपदेशन सुरु ठेवावे. तसेच प्रशासनास आवश्यक मनुष्यबळ कमी पडत असल्यास खाजगी एजन्सी अथवा स्थानिक प्रतिनिधींची मदत घेऊन पुढील धोका लक्षात घेत त्यांना प्रशिक्षण द्यावे. कामगारांच्या लसीकरणासंदर्भात शासनाने निर्देशित केलेल्या सुचनांची शहरातील खाजगी कंपन्यांनी अंमलबजावणी करावी, याबाबत प्रशासनाच्या वतीने कार्यवाही सुरु ठेवावी. तसेच महापालिकेच्या हॉस्पीटलमध्ये ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा उभारुन त्वरीत कार्यान्वित करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केल्या.

शहरातील हिन्दुस्थान ॲन्टीबायोटिक कंपनीमध्ये लस उत्पादनासंदर्भात आमदार महेशदादा लांडगे म्हणाले, हिन्दुस्थान ॲन्टीबायोटिक कंपनीकडे लस उत्पादनाची क्षमता आहे, त्यांनी तशी तयारी देखिल दर्शविली आहे. लस उत्पादनाचा विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारित असुन त्यासाठी कंपनीला केंद्र सरकारच्या परवानगीची गरज लागणार आहे. याकरीता महापालिकेने कंपनीची लस उत्पादनाबाबात सर्व तयारीची पडताळणी करुन घेणे गरजेचे आहे. जेणेकरुन केंद्रशासनाकडे परवानगीसाठी पाठपुरावा करणे सोयीस्कर होईल, याची काळजी देखिल महापालिकेने घेणे आवश्यक असल्याचेही आमदार लांडगे यांनी यावेळी सांगितले.