अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकूहल्ला

0
191

पुणे, दि. २५ (पीसीबी) – प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर चाकूहल्ला झाल्याचं धक्कादायक वृत्त आहे. पुण्यात सोनालीच्या वडिलांच्या राहत्या घरात घुसून माथेफिरुने चाकूने वार केले. यावेळी झालेल्या झटापटीत मनोहर कुलकर्णी जखमी झाल्याची माहिती आहे. मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास निगडीतील घरी ही घटना घडली. 24 वर्षीय अजय शेगटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली कुलकर्णीच्या वडिलांचे पुण्यातील निगडी प्राधिकरण भागातील सेक्टर क्रमांक 25 येथे घर आहे. आरोपी अजय शेगटे सकाळी अचानक सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दारात आला. त्यावेळी सोनालीचे आई-वडील घरात होते. सोनालीच्या वडिलांनी अजयला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र माथेफिरु अजयने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत 63 वर्षीय मनोहर कुलकर्णी किरकोळ जखमी झाले आहेत. चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याची तक्रार कुलकर्णींनी पोलिसांकडे दिली आहे.
कुलकर्णीच्या इमारतीतील रहिवाशांना याची माहिती मिळताच त्यांनी अजयला पकडले. त्यानंतर पोलिसांना तातडीने घटनास्थळी धाव घेत अजयला ताब्यात घेतले अजय आपण सोनाली कुलकर्णीचा फॅन असल्याचं सांगतो. निगडी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
सोनाली कुलकर्णीचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर आहेत. त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात जवळपास तीस वर्षे काम केले आहे. तिच्या आई सविंदर या पंजाबी असून त्यांनी देहू रोड, पुणे येथील COD (सेन्ट्रल ऑर्डनन्स डेपो)) येथे काम केले आहे.