‘शरद पवारांचा नातू म्हणून दुसरा न्याय का? त्यांनी गांभीर्याच भान ठेवलं पाहिजे’

0
308

मुंबई, दि.२५ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कोरोना रुग्णांसोबत नुकताच ‘झिंगाट’ गाण्यावर ठेका धरला. एकीकडे या डान्सचं कौतुक होत असतानाच विरोधकांनी मात्र टीका करायला सुरुवात केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी “पीपीई किट न घालता रोहित पवारांनी डान्स केला. शरद पवार यांचे नातू आहेत, म्हणून रोहित पवारांना दुसरा न्याय का?” असा सवाल उपस्थित केला आहे.

कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोव्हिड केअर सेंटरला कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. रुग्णांचे मनोबल वाढावे तसंच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रोहित पवार रुग्णांच्या चेहऱ्यावरील ताण दूर करण्यासाठी त्यांच्यासोबत झिंगाट गाण्यावर थिरकताना पाहायला मिळालं. यावेळी कोरोना रुग्णही भारावल्याचं चित्र दिसलं.

या सर्व प्रकारावरती दरेकर म्हणाले कि, “रोहित पवार यांनी एका कोव्हिड सेंटरवर जाऊन कोव्हिड प्रोटोकॉलचा भंग केला, तो निषेधार्ह आहे. कोणतंही पीपीई किट न घालता ते गेले, त्यामुळे ते सुपर स्प्रेडर ठरु शकतात. सर्व सामन्य नागरिकांना एक न्याय आणि रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत म्हणून त्यांना दुसरा न्याय का?, असा प्रश्न निर्माण होतो. कुणीही लोक प्रतिनिधी असो, त्यांनी गांभीर्याने या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे”, असं प्रवीण दरेकर म्हणाले.