शहरातील मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या दोघा सराईत भावांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
720

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील मंदिरांची रेकी करुन दान पेटीतील रोख आणि सोने-चांदीचे दागिने चोरणाऱ्या दोघा सख्या भावांना खंडणी विरोधी पथक आणि चिखली पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करुन जेरबंद केले आहे.

विशाल भालेराव आणि अजय भालेराव असे अटक करण्यात आलेल्या या सराईत दोघा भावांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल आणि अजय या दोघांनी काही दिवसांपूर्वी भोसरीमधील एका मंदिरातील दान पेटी चोरुन त्यातील रोख लंपास केली होती. याप्रकरणातील आरोपी हे सख्खे भाऊ असून ते भोसरीतील गवळी माथा येथे राहत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे यांना मिळाली होती. यावर पोलिसांनी आरोपी विशाल आणि अजय या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता दोघेही दिवसाच्या वेळी मंदिरांची रेकी करायेच आणि रात्री त्या ठिकाणी जाऊन चोरी करायचे, अशी कबुली दिली. अशाच प्रकारे त्यांनी निगडी, चिखली आणि पिंपरी या ठिकाणच्या मंदिरांमध्येही चोऱ्या केल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच या दोघांवर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी आणि वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.  ही कामगिरी खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे यांच्या पथकाने केली.