व्यापारी संबंध तोडल्यानंतर पाकिस्तानने समझोता एक्सप्रेसही केली बंद

0
801

इस्लामाबाद, दि. ८ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भारताबरोबर काल व्यापारी संबंध तोडल्यानंतर पाकिस्तानने आता भारत-पाकमध्ये धावणारी समझोता एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांचा स्तरही घटवणार आहे. भारतीय उच्चायुक्त अजय बिसारीया यांना पाकिस्तान सोडण्यास सांगितले असून पाकिस्तानी उच्चायुक्तही भारतात रुजू होणार नाहीत.

समझोता एक्सप्रेसच्या नियमित प्रवाशांसाठी पाकिस्तान सासर तर भारत माहेर अशी भावना आहे. थार एक्सप्रेस सुरु होण्यआधी समझोता एक्सप्रेसच भारत-पाकिस्तानला जोडणारे एकमेव रेल्वे कनेक्शन होते.

समझोता एक्सप्रेस चालू होऊन आज ४० पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. २२ जुलै १९७६ रोजी समझोता एक्सप्रेस सुरु झाली. सुरुवातीला अमृतसर ते लाहोर या ४२ किलोमीटरच्या मार्गावर ही ट्रेन धावायची. समझोता एक्सप्रेस दिल्ली, अटारी आणि लाहोर मार्गावर धावणारी साप्ताहिक ट्रेन आहे. ८० च्या दशकात पंजाबमधील वातावरण बिघडू लागल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय रेल्वेने अटारीमधून समझोता एक्सप्रेस बंद केली होती. आता ही ट्रेन अटारीपर्यंत जाते.

जेव्हा ही ट्रेन सुरु झाली तेव्हा दररोज या ट्रेनच्या फेऱ्या व्हायच्या. १९९४ पासून या ट्रेनच्या साप्ताहिक फेऱ्या सुरु झाल्या. पाकिस्तानात लाहोर आणि भारतात दिल्लीमध्ये या ट्रेनचा थांबा आहे. जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केल्यानंतर २००२ ते २००४ अशी दोन वर्ष समझोता एक्सप्रेस बंद करण्यात आली होती.

समझोता एक्सप्रेसला अनेकदा राजकारणासाठीही लक्ष्य करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या नापाक कृत्यांमुळे अनेकदा ही ट्रेन बंद करण्याची मागणीही करण्यात आली आहे. १९ फेब्रुवारी २००७ रोजी पानिपतमधील दिवाना स्टेशनजवळ समझोता एक्सप्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ६८ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पाकिस्तानी नागरीकांची संख्या जास्त होती. स्वामी असीमानंद यांच्यावर या स्फोटासाठी कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता. नंतर सबळ पुराव्याअभावी त्यांची सुटका झाली.