वादग्रस्त श्रीपाद छिंदमची पत्नीही निवडणुकीच्या रिंगणात  

0
1225

अहमदनगर, दि. २७ (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणारा नगर महापालिकेचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांने स्वतःसह पत्नी स्नेहा छिंदमलाही प्रभाग  क्रमांक १३ मधून निवडणूक रिंगणात उतरविले आहे.  त्यामुळे वादग्रस्त विधान करून जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले, तरीही निवडणूक लढवण्याच्या छिंदमच्या निर्णयावर शहरामध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

छिंदमने  प्रभाग क्रमांक ९ मधून स्वतः अपक्ष उमेदवारी केली आहे. तर  त्याच्या विरोधात शिवसेनेचे सुरेश तिवारी, आघाडीकडून राष्ट्रवादीच्या अनिता राठोड, तर भाजपकडून प्रदीप परदेशी  हे उमेदवार रिंगणात आहेत.  इतर पक्षात उमेदवारांमध्ये मत विभागणी झाल्यास पदमशाली समाजाची हक्काचे मते मिळण्याचा विश्वास छिंदम याला आहे.

तर दुसरीकडे छिंदमने पत्नीला प्रभाग १३ मधून अपक्ष रिंगणात उतरवले आहे. तर त्यांच्याविरोधात   राष्ट्रवादीच्या नीलम दांगट, भाजपच्या गायत्री कुलकर्णी, शिवसेनेच्या सुवर्णा गनप्पा यांना उमेदवारी दिली आहे. या प्रभागातही पद्मशाली समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात  असल्याने येथेही फायदा होण्याचा विश्वास  छिंदमला आहे. दरम्यान, या दोन्ही प्रभागांमध्ये छिंदम आणि त्याच्या पत्नीची उमेदवारी नागरिकांना रूचते का याकडे नगरवासीयांचे  लक्ष लागून राहिले आहे.