अबब…पेग घेऊन कोरोनावर मात

0
319

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) : आज रात्रीपासून दिल्लीत कडक लॉकडाऊन लागू होणार आहे. त्यामुळे दिल्लीतील प्रत्येक दारूच्या दुकानासमोर तळीरामांनी प्रचंड गर्दी केली आहे. आठवडाभराचा स्टॉक खरेदी करण्यासाठी ही झुंबड उडाली आहे. पुरुषांबरोबर महिलाही दारू घेताना दिसत आहे. एका महिलेने तर दवाई से मारे को असर नही होगा, पेग से असर होगा असं म्हटलं आहे. दारुचं महत्त्व सांगणारा या महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्याला प्रचंड लाईक्स मिळतानाही दिसत आहे.

दिल्लीत कोरोनाचा स्फोट झाला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने अखेर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाईलाजाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. आज रात्रीपासून हा लॉकडाऊन सुरू होणार आहे. सात दिवस लॉकडाऊन असेल. यावेळी सर्व काही बंद राहणार आहे. त्यामुळे दिल्लीत तळीराम हवालदिल झाले असून त्यांनी दारुचा स्टॉक करण्यासाठी दारुच्या दुकानांबाहेर तोबा गर्दी केली आहे. दिल्लीतील शिवपुरी य़ेथील गीता कॉलनीच्या एका दारुच्या दुकानात एक महिलाही दारू खरेदी करण्यासाठी आली होती. दारू खरेदी केल्यानंतर तिने मीडियाशी संवादही साधला.

काय म्हणाली महिला?
दोन बॉटल पौवे खरेदी केले आहेत. त्यात अल्कहोल आहे. त्यामुळे आम्ही घ्यायला आलो आहोत. इंजेक्शन जेवढं काम करणार नाही, तेवढं काम हे अल्कहोल करेल. जेवढी दारू विकेल तेवढे दारू पिणारे ठणठणीत राहतील असं ती म्हणाली. या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका दारु पिणाऱ्यांना बसणार असल्याचंही तिने सांगितलं. औषधांचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. परंतु, पेग घेतल्यावर लगेच परिणाम होईल. मी गेल्या 35 वर्षांपासून पित आहे. आजपर्यंत दारुशिवाय मी कोणताही डोस घेतला नाही. रोज एक पेग घेते. त्यावरच भागतं असंही ती म्हणाली.

दिल्लीत लॉकडाऊन लावल्यावर किमान दारुचे गुत्ते सुरू राहावेत. त्यामुळे आम्ही डॉक्टरकडे जाणार नाही. अजूनपर्यंत तरी डॉक्टरकडे गेलो नाही, पुढेही जाणार नाही, असंही तिने दारुचं महत्त्व सांगताना स्पष्ट केलं. या महिलेच्या या संपूर्ण संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर अनेकजण हसत आहेत. तर अनेकांनी लाईक्स करून या महिलेचं समर्थनही केलं आहे.