वाकड, हिंजवडी, तळेगाव, चाकण परिसरात गुटखा विक्री प्रकरणी आठ कारवाया : आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
229

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाकड, हिंजवडी, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ ठिकाणी गुटखा विक्री प्रकरणी कारवाई केली. याबाबत मंगळवारी (दि. 4) संबंधित पोलीस ठाण्यात 19 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकडमध्ये दोन ठिकाणी गुटखा विक्री प्रकरणी कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कारवायांमध्ये 27 हजार 747 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दोन्ही कारवाया वाकड पोलिसांनी केल्या आहेत.

हिंजवडी पोलिसांनी बावधन येथे कारवाई करून एकाला अटक केली. त्याच्याकडून दोन लाख 28 हजार 550 रुपयांचा गुटखा आणि एक कार जप्त केली आहे. गोविंद जेपाराम प्रजापती (वय 47, रा. बावधन) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुदूंबरे येथे सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली. त्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून तीन लाख 86 हजार 90 रुपयांचा रोख रक्कम, मोबाईल फोन आणि गुटखा असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. समीर दत्तात्रय गाडे (वय 38, रा. सुदूंबरे, ता. मावळ), कल्लू उर्फ कृष्णमूर्ती राजेंद्र गुप्ता (वय 26, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी दोन कारवाया केल्या. त्यात दोघांना अटक करण्यात आली आहे. राजवाडा चौकात दोन्ही कारवाया केल्या असून सहा हजार 16 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिसरी कारवाई तळेगाव दाभाडे पोलिसांनी केली. उर्से गावातील तीन किराणा दुकानातून 53 हजार 830 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळेगाव रोडवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून एक लाख 95 हजार 388 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.