वाकड-पिंपळेनिलख प्रभागात विकासकामांचा डोंगर उभारणार – स्थायी समिती सभापती ममता गायकवाड

0
615

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक २६, वाकड-पिंपळेनिलखमध्ये चालू आर्थिक वर्षांत अनेक विकासकामांना सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांनी दिली. ममता गायकवाड प्रभाग क्रमांक २६ मधून निवडून आल्या आहेत.

स्थायी समिती सभापती ममता गायकवाड म्हणाल्या, “वाकड-पिंपळेनिलख परिसरात पाण्याची समस्या आहे. त्यावर कायमचा उपाय म्हणून अमृत योजनेच्या २४ तास पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत संपूर्ण प्रभागात नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. प्रभागात लवकरच २५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे वाकड-पिंपळे निलखमधील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. मॉडेल प्रभाग करण्यासाठी प्रभागातील अनेक रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात येणार आहेत. कावेरी सब-वे ते पिंक सिटी कॉर्नरपर्यंतचा रस्ता, काळेवाडी फाटा ते छत्रपती चौकपर्यंतचा रस्ता, छत्रपती चौक ते उत्कर्ष चौक रस्ता, विशालनगर वाघजाई हॉटेलपासून ते कास्पटे चौकपर्यंतचा रस्ता तसेच वाकड आणि पिंपळेनिलखमधील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात येणार आहेत.

प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वाकडमध्ये प्रशस्त असे विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार आहे. वेणुनगर येथे लहान मुले व नागरिकांसाठी लिनियर गार्डनच्या धर्तीवर उद्यान विकसित करण्यात येणार आहे. कस्पटेवस्तीमध्ये अद्ययावत स्मशानभूमी उभारण्याच्या कामाला गती दिली आहे. या स्मशानभूमीत विद्युतदाहिनी आणि नागरिकांना धुराचा त्रास होऊ नये म्हणून योग्य टे आउटलेट्स असणार आहेत. स्थायी समिती सभापती म्हणून आपल्या प्रभागात वरील सर्व विकासकामे मार्गी लावणार आहे. वाकड-पिंपळेनिलख प्रभाग नागरिकांसाठी सर्व सुविधांनीयुक्त प्रभाग बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.”