राज ठाकरे यांच्याकडे व्होट बॅंक; दुर्लक्ष करून चालणार का ? – अजित पवार

0
852

नागपूर, दि. ३१ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे निश्चित अशी एक व्होट बॅंक आहे. मनसेचे १३ आमदार राज्यात होते. हे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी ‘मनसे’ला आघाडीत घेण्यास आग्रही असल्याचे सुचक मत व्यक्त केले.

अजित पवार काटोल येथे शेतकरी मेळाव्यासाठी आले होते. त्यानंतर ते नागपुरात पत्रकारांशी  बोलत होते.   यावेळी त्यांना मनसेला आघाडीत घेण्याबद्दल  काँग्रेसच्या काही नेत्यांनी विरोध केल्याचे लक्षात आणून दिले. यावर ते म्हणाले की,  काँग्रेस व राष्ट्रवादी  धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याने  आम्ही कोणत्याही  धर्माची पताका घेतलेली नाही. या दोन्ही पक्षाची भूमिका राज ठाकरे यांना मान्य आहे काय? हे आधी स्पष्ट झाले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

राजकारणात सतत  बदल होतात. मनसेचे राज्यात १३ आमदार निवडून आले होते.  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या  अनेक उमेदवारांनी लाखभर मते घेतली  आहेत, असे सांगून  राजकारणात कुणीच कायमचा शत्रू वा मित्र नसतो, असे पवार म्हणाले.  आघाडीत कोणत्या पक्षांना बरोबर घ्यावयाचे, याबद्दल येत्या २ नोव्हेंबरला होणाऱ्या बैठकीत  विचारविनिमय करण्यात येणार आहे. तसेच या बैठकीत  प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे यांच्यासह इतर पक्षाबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी  सांगितले.