वांद्रे पूर्वेतून महाडेश्वर निवडणुकीच्या रिंगणात; विद्यमान आमदाराचा पत्ता कट

0
425

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – वांद्रे पूर्व मतदारसंघातून मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलण्यात आले आहे. दरम्यान उमेदवारी नाकारलेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी मातोश्री बाहेर ठिय्या मांडला होता.

वांद्रे पूर्व मतदारसंघात विश्वनाथ महाडेश्वर यांना संधी देण्यात आल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान विद्यमान आमदार अशोक पाटील आणि तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या त्यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडल्याचे पहायला मिळाले. अशोक पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली नसून यावर आम्हाला विश्वासच बसत नाही. आम्हाला न्याय हवा आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आमच्यासोबत न्याय करतील, अशी प्रतिक्रिया या ठिकाणच्या आंदोलकांकडून देण्यात आली.

अशोक पाटील यांचे तिकिट कापण्यामागचे कारण काय हे सांगण्यात आले नाही. त्यांचे कामही उत्तम आहे, त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. भांडुपमध्ये त्यांचे कामही व्यवस्थितरित्या सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला केवळ त्यांचे तिकिट कापण्यामागचे कारण काय हे सांगावे एवढीच आमची इच्छा असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. तृप्ती सावंत या वांद्रे पूर्व येथील विद्यमान आमदार आहेत. २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत विजयी झाल्या होत्या. दरम्यान, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असून आज अनेक दिग्गज आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.