वंचितला धक्का! शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

0
218

पिंपरी, दि.२२ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठींबा दिलेल्या वंचित बहुजन विकास आघाडीला धक्का बसला आहे. शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्यासह संपूर्ण कार्यकारणीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत तायडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

यावेळी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह चिंचवड विधानसभा निरीक्षक सुनील आण्णा शेळके, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, प्रदेश युवक चे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, मराठवाडा विकास संस्थेचे अरुण पवार, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रवेशावेळी बोलताना तायडे म्हणाले, भाजपच्या सत्ताकाळात देशातील वंचितांच्या शोषणाची परिसीमा गाठली आहे. त्यामुळे वंचित घटकाच्या संरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाला मदत करणारी कोणतीही कृती टाळली पाहिजे, ही कार्यकर्त्यांची भावना होती. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. देशात भाजपकडून हुकूमशाही आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

वंचित घटकांच्या शोषणाने कळस गाठला आहे. त्यामुळे भाजपचा पराभव करणे ही काळाजी गरज बनली आहे. मात्र, वंचित बहुजन विकास आघाडीने भाजपला पूरक ठरणारी भूमिका या मतदार संघात घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. पक्षाच्या नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात स्थानिक कार्यकर्ता असल्यामुळे एकाही वंचिताचे मत दुसरीकडे जाणार नाही, असेही ते म्हणाले.